छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मित्रांनी पार्टीसाठी बोलावून कुख्यात गुंडाची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.२२) पहाटे शिवाजीनगर परिसरात घडली. करण ऊर्फ रोहित रवी म्हस्के (वय २३, रा. मुकुंदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अक्षय पडूळ, कृष्णा उदावंत (वय २९), सागर घुले (२३), शेख बादशाह शेख बाबा (२५), प्रफुल्ल पाखरे (२३), शोएब जावेद शेख (२२) (सर्व रा. भारतनगर व पुंडलिकनगर परिसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत करणचा भाऊ रोहन ऊर्फ सोन्या म्हस्के याने तक्रार दिली. त्यानुसार करण हा मंगळवारी (दि.२१) रात्री आठच्या सुमारास आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने आपण मित्रांसोबत असल्याचे
सांगितले. परंतु मध्यरात्रीनंतरही तो परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. बुधवारी पहाटे साडेचारला कुटुंबीयांना शिवाजीनगर परिसरातील मेहेरसिंग नाईक कॉलेजसमोर काही जणांनी मिळून करणवर हल्ला केल्याचे समजले. मृत यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ घाटी रुग्णालय गाठले. तेथे करण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
पोकारागृहातून सुटताच खून
माहितीनुसार, गुन्ह्यात करण ऊर्फ रोहित हा मार्चपासून कारागृहात होता. पाच दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. करण व आरोपी यांच्यात चांगली मैत्री होती. दोन महिन्यांपूर्वी आरोपींसोबत झालेल्या वादातून त्याची हत्या झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या सुमारे तासाभरापूर्वीच आईने त्याला फोन करून जेवायला कधी येणार? अशी विचारणा केली होती. त्यावर आपण मित्रांसोबत आहोत. येतोच, असे तो म्हणाला. हे त्याचे शेवटचे वाक्य ठरले.
हे आहेत आरोपी
आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे
घटनेतील आरोपी शेख बादशहा शेख बाबा याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह एकूण चार गुन्हे दाखल आहेत. प्रफुल्ल पाखरे याच्यावर तीन, कृष्णा उदावंत याच्यावर मंगळसूत्र चोरीसह विविध गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. दरम्यान, खुनानंतर आरोपी अक्षय पडूळ फरार झाला होता. बुधवारी (दि. २२) त्याला गुन्हे शाखेने रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.
https://epaper.sanjwarta.in/















